मुंबई गोवा महामार्गावरील लांजा उड्डाणपुलावर कारची कामगाराला धडक; जागीच मृत्यू


लांजा शहरातील उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराला भरधाव महिंद्रा कारने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिलर क्रमांक ३ येथे घडला. या दुर्घटनेत उड्डाणपुलावरील कामगाराचा पहिला बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवापूर्वी लांजा शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, उड्डाणपुलावरील काही किरकोळ कामे अद्याप सुरू आहेत. मंगळवारी गोपाल मुरमु (४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) हा कामगार उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करीत होता.
याचवेळी गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा कारने (क्र. KA 03 AC 3600) गोपाल मुरमु यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारने त्यांना काही अंतर फरफटत नेले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही कार मौला कासम शेख (३८, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी; मूळ रा. आबावाडी, अक्कलकोट, जि. सोलापूर) हा चालवत होता. या घटनेबाबत सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजशेखरन मुरुगन (३४, रा. तामिळनाडू) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून ड्रेनेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगाराच्या गंभीर दुखापतीसह मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कारचालक मौला कासम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातामुळे लांजा उड्डाणपुलावरील सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button