दहावीच्या विद्यार्थ्यांना १ जून रोजी मूळ गुणपत्रकांचे वितरण


रत्नागिरी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रकांचे वितरण सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत संबंधित वितरण केंद्रांवरून शाळांच्या प्रतिनिधींना मूळ गुणपत्रके व तपशीलवार गुणपत्रक अभिलेख हस्तांतरित करण्यात येतील.
शाळांनी अधिकृत लेखीपत्रासह प्रतिनिधी पाठवून हे साहित्य स्वीकारावे. गुणपत्रके प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रके वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंडळाने शाळांना गुणपत्रक वितरणाबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त झालेली गुणपत्रके संबंधित शाळेचीच असल्याची खात्री करून घ्यावी. चुकीची गुणपत्रके मिळाल्यास ती तात्काळ मंडळ कार्यालयाकडे परत पाठविण्याची व्यवस्था करावी.
गुणपत्रकांचा गैरवापर होऊ नये यासाठी ती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातीच देण्यात यावीत. गुणपत्रक स्वीकारल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन त्याची नोंद शाळेच्या दप्तरी जतन करणे बंधनकारक राहणार आहे.
विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यापूर्वी त्यावरील नाव, विषय, गुण, लेमिनेशन, छपाई तसेच विभागीय सचिवांची स्वाक्षरी यांची काळजीपूर्वक पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही त्रुटी असलेली गुणपत्रके विद्यार्थ्यांना देऊ नयेत. गुणपत्रकांमध्ये त्रुटी आढळल्यास किंवा संख्या कमी-अधिक असल्यास तात्काळ मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा.
गुणपत्रक दुरुस्तीसाठी शाळेचे शिफारसपत्र, विद्यार्थ्याचा अर्ज, नियमानुसार शुल्क, जनरल रजिस्टरची प्रमाणित प्रत, शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतस्वाक्षरी तसेच घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी शाळेच्या प्रतिनिधींनी मूळ जनरल रजिस्टरसह मंडळ कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button