धोपेश्वर गणातून भाजपचे उमेदवार अभिजित गुरव यांच्या विजयानंतर तब्बल तीन दशका नंतर भाजपने पंचायत समिती सभागृहात केला प्रवेश ….

राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या लागलेल्या निकालात धोपेश्वर गणातून भाजपचे उमेदवार अभिजित गुरव यांच्या विजयानंतर तब्बल तीन दशका नंतर भाजपने पंचायत समिती सभागृहात प्रवेश केला आहे. सन १९९५ साली भाजप कडून देवाचे गोठणे गणातून प्रकाश गुरव विजयी झाले होते. आणि नंतर त्यांनी उपसभापती पद भूषविले होते.
देशासह अनेक राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपला मागील काही वर्षात राजापूर तालुक्याला तेवढा जनाधार मिळालेला नाही. हे एक वास्तव आहे. राजापूर तालुक्यातील किरकोळ ग्रामपंचायत वगळता भाजपला मागील अनेक वर्षात जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये यश मिळवता आलेले नाही. यापूर्वी १९९५ मध्ये शिवसेना, भाजप युतीची सत्ता राजापूर पंचायत समितीवर आली होती. त्यावेळी शिवसेनेचे आठ तर भाजपचा एक असे नऊ सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये देवाचे गोठणे पंचायत समिती गणातून महायुती मधून भाजपचे प्रकाश गुरव निवडून आले होते. पुढे ते उपसभापती देखील झाले होते. त्यानंतर गेल्या तीन दशकाच्या कालखंडात राजापूर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या प्रत्येक निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढली होती. विधानसभा निवडणूक देखील लढले होते. मात्र पराभवाने धरलेली पाठ काही सुटली नव्हती. निवडणूक निकालात भाजपची पाटी कोरीच रहात होती.तब्बल तीन दशके राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी भाजपला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.
दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात राजापूर तालुक्यातून महायुतीने दणदणीत यश संपादन केले. त्यामध्ये शिवसेना(शिंदेगटाने ) मोठी बाजी मारली होती. भाजप कडून धोपेश्वर गटातून
अभिजित गुरव यांनी
विजय संपादन करत प्रदीर्घ कालखंडानंतर भाजपला राजापूर पंचायत समिती मध्ये पुन्हा प्रवेश करता आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button