
‘माझी नोकरी जाईल, सुनावणी लवकर घ्या’; युकेस्थित डॉ. संग्राम पाटलांची हायकोर्टाकडे कळकळीची विनंती, काय आहे प्रकरण?
मुंबई : युकेस्थित आपली नोकरी धोक्यात आली आहे. त्यामुळे आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी कळकळीची विनंती भारत सोडण्यास मज्जाव करण्यात आलेले डॉ. संग्राम पाटील यांनी उच्च न्यायालयाकडे केली. त्यावर,त्यांच्या याचिकेवर १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
युकेस्थित डॉक्टर आणि यूट्यूबर असलेले पाटील हे पर्यटक व्हिसावर भारत दौऱ्यावर आले होते. तथापि, त्यांनी भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यांना भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच, त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला गेला. याविरुद्ध पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या एकलपीठापुढे त्यांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने युकेस्थित आपली नोकरी धोक्यात आली आहे, असे पाटील यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली.
वेळेअभावी पाटील यांची याचिका सुनावणीसाठी येऊ शकली नाही. परंतु, या प्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू, असे एकलपीठाने म्हटले. त्यावर, पाटील आणि मुंबई पोलिसांच्या वकिलांनी सहमती दर्शवली.
दरम्यान, देशाबाहेर राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल समाजमाध्यमावरून बदनामीकारक, निंदनीय आणि चिथावणीखोर मजकूर प्रसिद्ध करणे हे एका मोठ्या, संघटित कटाचा भाग असू शकतो, असा दावा मुंबई पोलिसांनी पाटील यांच्या याचिकेला उत्तर देताना गेल्या आठवड्यात केला होता. तसेच याच कारणास्तव पाटील यांची चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले होते.
परदेशी नागरिक असलेले पाटील हे पर्यटक व्हिसावर भारतात आले. तथापि, भारतात येण्यापूर्वी पंतप्रधानांबद्दल कथितपणे निंदनीय आणि आक्षेपार्ह मंजकूर त्यांनी ऑनलाइन व्यासपीठावर का प्रसिद्ध केला ? असा प्रश्न पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे, अशी कृत्ये घटनात्मक पदावरील व्यक्तीला बदनाम करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मोठ्या आणि संघटीत कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पोलीस उपायुक्तांनी (गुन्हे) प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाटील यांची चौकशी आवश्यक आहे. तसेच, ते इंग्लंडला परतल्यास त्यांचा माग काढणे कठीण होईल, असा दावा देखील पोलिसांनी केला होता.
प्रकरण काय ?
डॉ. पाटील यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये, भाजपासह त्याच्या प्रमुख नेत्यांबद्दल काही मजकूर प्रसिद्ध केला होता. तथापि, चुकीची माहिती पसरवण्याच्या उद्देशाने पाटील यांनी आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट प्रकाशित केल्याचा दावा भाजपच्या समाजमाध्यम खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या निखिल भामरे यांनी केला. तसेच पाटील यांच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पाटील यांना भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला.




