देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन; तारापूरमधील दोन अणुभट्ट्यांमधून वीजनिर्मिती सुरू!


तारापूर येथे ऑक्टोबर १९६९ मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्संचरण लूपची वाहिनी बदलण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण झाले आहे. सहा वर्षानंतर १६० मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती या अणुभट्टीतून झाली. तारापूर १ व २ या अणुभट्ट्यांचे किमान १० वर्षे आयुर्मान लक्षात घेता त्यांचे पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला यश आले आहे.

‘बॉईलिंग वॉटर रिॲक्टर’ अर्थात पाणी उकळून वीजनिर्मिती करणाऱ्या दोन अणुभट्ट्या तारापूर येथे १९६९ मध्ये कार्यरत करण्यात आल्या. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला २२० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता १६० मेगावॉट इतकी मर्यादित ठेवण्यात आली होती. सध्या ‘प्रेशराईज हेवी वॉटर रिॲक्टर’ पद्धतीच्या प्रत्येकी दोन ५४० मेगावॅट अणुभट्ट्यांच्या (३ व ४) साहाय्याने तारापूर येथे १४०० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.

तारापूरच्या अणुभट्टी १ येथे नियमित तपासणीदरम्यान ‘रिसर्क्युलेशन पायपिंग’ अर्थात पुनर्संचरण लूपच्या वाहिनीची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. त्यातून गळतीची शक्यता लक्षात घेता जानेवारी २०२० मध्ये अणुभट्टी बंदचा निर्णय झाला. जुलै २०२० मध्ये अणुभट्टी २ याच समस्येमुळे बंद करण्यात आली. या वाहिनीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेऊन देशातील या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोर इंजीनियरिंग कंपनीच्या माध्यमातून झालेल्या या कामासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यात अणुभट्टी १ च्या कामाला प्राधान्य देण्यात आले.

अणुऊर्जा नियामक मंडळाने तपासणी करून ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वीजनिर्मितीस ही अणुभट्टी कार्यक्षम असल्याचा दाखला दिला. त्यानंतर अणुभट्टीत इंधन म्हणून युरेनियम साठा भरण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ३० डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आला. त्यानंतर २९ जानेवारी रोजी रात्री १०.२२ वाजता अणुभट्टी १ मधून उत्पादित वीज राष्ट्रीय विद्युत ग्रीडला जोडण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी तांत्रिक कारणामुळे वीज उत्पादन बंद करण्यात आले.

टरबाइनमधील काही ज्वलनशील पदार्थांमुळे धूर येण्याची घटना घडल्याची शक्यता तारापूर अणुऊर्जा केंद्राचे प्रकल्प संचालक अजय कुमार भोळे यांनी व्यक्त केली. आवश्यक दुरुस्ती व बदल करून पुढील चार-पाच दिवसांत अणुभट्टी १ मधून वीजनिर्मिती सुरू केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अणुभट्टी २ मधील बहुतांश नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे परीक्षण अणुऊर्जा नियम मंडळातून होऊन त्यानंतर पुढील तीन महिन्यांत या अणुभट्टीमधून वीज उत्पादन १६० मेगावॉटपर्यंत सुरू करण्याचा निर्धार अजय कुमार भोळे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button