पत्रकार जमीर खलफे ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई सान पाडा येथे आंतरराष्ट्रीय पंच आत्माराम चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित

रत्नागिरी: पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. ‘दिशा महाराष्ट्राची’ यूट्यूब चॅनल आणि वेब पोर्टलच्या वतीने आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनांतर्गत राज्यस्तरीय सन्मान सोहळा व काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने हा सोहळा पार पडला. ‘दिशा महाराष्ट्राची’चे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली होती. जमीर खलफे यांनी आजवर प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आणि यूट्यूब चॅनेल अशा विविध माध्यमांतून जनसामान्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय बहुमान देण्यात आला आहे.

जमीर खलफे यांचा पत्रकारितेतील प्रवास अत्यंत प्रभावी राहिला असून, त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. यापूर्वी त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कोकणरत्न’ आणि ‘समाजभूषण’ यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. केवळ पत्रकारिताच नव्हे, तर विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातूनही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सध्या ते युनिक फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषदेचे रत्नागिरी तालुका सचिव, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख आणि सैतवडे सोशल वेल्फेअरचे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या नवीन यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातून आणि सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांच्या आगामी वाटचालीस प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

यावेळी दिशा महाराष्ट्राची यू ट्यूब चॅनेल आणि वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण, प्रमुख पाहुण्या अर्चना मोहिते, अभिनेता राजेश जाधव, ऍड. विजय उंबरे, निखिल सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button