
चिपळूण तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात कुळीथ, चवळी पीकक्षेत्र सर्वाधिक
चिपळूण तालुक्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कुळीथ व चवळी पिकांची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे. कृषीच्या प्रोत्सानानुसार यंदा हरभरा पिकांच्या लागवडीला शेतकर्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे. कृषीच्या प्रयत्नानंतर शेतकरीवर्ग पुन्हा पालेभाजी लागवडीकडे वळल्याने यापूर्वी सरासरीच्या पलिकडे न गेलेल्या भाजी क्षेत्रात यंदा ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोकणात प्रामुख्याने भातशेती हे प्रमुख पीक घेतल्यानंतर त्यास जोड पीक म्हणून कडधान्य व भाजी पिकाची लागवड केली जाते. गेली कित्येक वर्षाचे हे समीकरण असून साधारण हिवाळी हंगाम सुरू होताच या कडधान्य पिकांची लागवड केली जाते. कडधान्याप्रमाणेच भाजीपाला लागवडीमध्ये तालुक्यातील कळवंडे, गोवळकोट, कामथे, पेढे, खोपड, आदी गावे आघाडीवर आहेत. या गावामधून प्रामुख्याने चवळी, कुळीथ, पावटा व पालेभाज्यांची विशेष लागवड केली जाते. यंदा रब्बी हंगामाचा विचार करता कुळाथ, चवळी, पावटा या तीन पिकांच्या लागवडीला शेतकर्यांनी प्राधान्य दिले असून त्याखालोखाल मुग, भूईमुग या पिकांचा समावेश आहे. गतवर्षी कृषी विभागाने मसूर कडधान्य लागवडीसाठी बियाणांचे वाटप केले होते. मात्र लागवडीनंतर त्यास पोषक वातावरण न मिळाल्याने हा प्रयोग म्हणावा तसा यशस्वी झाला नव्हता. यामुळे यंदा त्याऐवजी हरभरा लागवडी प्रयोग अंमलात आणण्यात आला आहे. त्यासाठी तालुका कृषीकडून १० हेक्टवरील शेतकर्यांना त्याचे वाटप करण्यात आले आहे. यामुळेच तालुक्यात हरभरा-९.३३ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
सरासरीच्या पलीकडे न गेलेला तालुक्यातील भाजीक्षेत्र कृषीच्या प्रयत्नानंतर यंदा ३० टक्क्याने वाढले आहे. गतवर्षी ९४.६३ इतक्याच क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये कळवंड, कामथे ही गावे आघाडीवर होती. असे असताना भाजी पिकांतून आर्थिक नफा मिळू शकतो यासाठी बहुतांशी शेतकर्यांनी भाजी लागवडीकडे वळले. त्यातूनच यंदा १२५.३१ हेक्टरक्षेत्र भाजीपाला लागवडीखाली आले आहे.
www.konkantoday.com




