रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकाभिमुख उपक्रम – “मिशन प्रतिसाद”

रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक-केंद्रित पोलिसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल ॲप्लिकेशन्स सुरू केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.

यामध्ये नावीन्यपूर्ण व लोकाभिमुख मिशन राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, तक्रार निवारणासाठी व त्यांचे जीवन अधिक सुरक्षित व सुलभ करण्याच्या उद्देशाने “मिशन प्रतिसाद” हा विशेष लोकाभिमुख उपक्रम १० सप्टेंबर २०२५ पासून राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दल जास्तीत जास्त नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, विशेषतः एकटे राहणारे, दुर्गम भागात वास्तव्यास असलेले व सहाय्याची गरज असलेले ज्येष्ठ नागरिक यांना तात्काळ पोलीस मदत उपलब्ध करून देणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.

या “मिशन प्रतिसाद” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दोन हेल्पलाइन क्रमांक (9684708316 व 8390929100) असे सुरू करण्यात आले आहेत. या हेल्पलाइनवर किंवा डायल ११२ वर प्राप्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी, अडचणी अथवा मदतीच्या विनंत्या “मिशन प्रतिसाद” या स्वतंत्र व समर्पित कक्षामार्फत तात्काळ नोंदविण्यात येतात. या कक्षासाठी स्वतंत्र ४ पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तक्रार प्राप्त होताच संबंधित माहिती त्वरित त्या हद्दीमधील पोलीस ठाण्यास कळविण्यात येते. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष तक्रारदार ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या समस्येचे तात्काळ निरसन करतात.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर बीट अंमलदार व मिशन प्रतिसाद कक्षामार्फत संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येचे समाधान झाले आहे की नाही, याची पुन्हा खात्री करुन घेतली जाते व त्यानंतरच संबंधित तक्रार बंद (Closure) करण्यात येते.

मिशन प्रतिसाद कक्षामार्फत या सर्व तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात आले असून, त्यातील माहिती दररोज अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी व पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांच्या समक्ष सादर करण्यात येते. श्री. बगाटे हे स्वतः या तक्रारींचा आढावा घेत असून, काही प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी थेट फोनवरून संवाद साधून समाधानाची खात्री केली जाते व कोणतीही त्रुटी आढळल्यास तात्काळ सुधारात्मक कार्यवाही केली जाते.

आजपर्यंत मिशन प्रतिसाद अंतर्गत एकूण २०३ ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तक्रारी (जसे -मुलांनी केलेली मारहाण व शिवीगाळ बाबत, मुलांचा शोध घेणे, शिधा न मिळणे, आर्थिक फसवणूक होणे, कर्कश ध्वनी प्रदूषण होणे, सामूहिक बहिष्कार घालणे, अपघाताच्या वेळी मदत न मिळणे, स्वतःच्या आजारपणाच्या मदतीसाठी, घरघुती वादविवाद बाबत आदी) प्राप्त झाल्या असून त्यांचे १०० टक्के व प्रभावीपणे निरसन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार, दुर्गम व कमी लोकसंख्या असलेल्या खेड्या पाड्यात व गावांपर्यंतही पोलीस अधिकारी व अंमलदार पोहोचून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवित आहेत व मदत पोहचवित आहेत.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी “मिशन प्रतिसाद” अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकांचा निर्भयपणे वापर करावा. ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोलीस मदत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी स्वतः स्वीकारली असून, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल कटिबद्ध आहे.

तसेच “मिशन प्रतिसाद” या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनास कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button