रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘मिशन जीवन’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा


रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘मिशन जीवन’ या उपक्रमांतर्गत १ जानेवारी २०२६ रोजी एक अत्यंत स्तुत्य आणि भावनिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून, ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी असतो, अशा लांजा व संगमेश्वर तालुक्यातील शेकडो ज्येष्ठांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमामुळे पोलीस दलाची एक संवेदनशील आणि मानवी बाजू समोर आली आहे.
​हा सोहळा लांजा येथील वेरुळ व गव्हाणे येथील सभागृहात आणि संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लांजा पोलीस ठाणे हद्दीतील १७७ आणि संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील ३०० असे एकूण ४७७ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प दिले आणि केक कापून सर्वांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम आणि इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेरुळ-लांजा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे पाय धुवून त्यांचे आशीर्वाद घेतले, ज्यातून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला. आपल्या मनोगतात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी भावूक होत सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात असा उपक्रम पहिल्यांदाच होत असून यामुळे त्यांना पोलिसांच्या रूपाने मोठा आधार मिळाला आहे. पोलीस अधीक्षक बगाटे यांनी यावेळी ‘मिशन जीवन’चा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि ज्येष्ठांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पोलीस दल नेहमीच तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button