
लक्ष्मी ऑरगॅनिकच्या घातक केमिकल उत्पादनाविरोधात चिपळूण येथेही उबाठा शिवसेना आक्रमक
लोटे परशुराम एमआयडीसीत पिफास म्हणजेच कॉरेव्हर केमिकल्स म्हणून ओळखल्या जाणार्या अत्यंत घातक रसायनांच्या उत्पादनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या या उत्पादनाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या संपूर्ण प्रकरणाची थेट जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घ्यावी, अशी मागणी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सचिन आंब्रे यांनी केली आहे.
पिफास सारखी रसायने पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात आणि त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. कोकणासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात अशा घातक केमिकल्सचे उत्पादन सुरू करण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल शिवसेना उबाठाने उपस्थित केला आहे. सचिन आंब्रे यांनी सांगितले की, कोकणात प्रदूषण करणारे उद्योग येवूच देणार नाही, असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला होता. मात्र पिफास सारख्या अत्यंत घातक रसायनांच्या उत्पादनाला परवानगी दिली जात असल्यास तो शब्द कसा काय पाळला जातो, असा थेट सवाल त्यांनी केला.www.konkantoday.com




