
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात, अटकेची टांगती तलवार. सदनिका प्रकरणात शिक्षा कायम!
- बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना झालेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रिपद धोक्यात आले आहे. मंत्री कोकाटे यांना जामीन मिळू नये म्हणून हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांनी उच्च न्यायालयात कागदपत्रे सादर केल्याचे म्हटले आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री ॲड. कोकाटे हे सदनिका प्रकरणात शिक्षा कायम राहिल्याने अडचणीत आले आहे. बनावट दस्तावेजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली होती. अपिलात सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना जामीन मंजूर करून शिक्षेच्या अंमलबजावणीस आधीच स्थगिती दिली. अपिल प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती न दिल्यास कोकाटे बंधुंचे नुकसान होईल, या बाबी न्यायालयासमोर मांडण्यात कोकाटे यांच्या वकिलांकडून मांडल्या गेल्या होत्या.
या संदर्भात मूळ तक्रार दिवंगत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तेव्हा माजीमंत्री दिघोळे यांची कन्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यांची बाजू ॲड. आशुतोष राठोड यांनी मांडली. कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याची माहिती ॲड. राठोड यानी दिली.




