भाजप देशाचा तारणहार हा समज म्हणजेच घोटाळा, उद्धव ठाकरे यांचा टोला!


मुंबई : दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटावर आता कुणीच बोलत नाही. दिल्लीचे बॉम्बस्फोट झाले कसे? त्यात किती लोक गेले? हे बॉम्बस्फोट कुणी केले? पहलगाममध्ये अतिरेकी घुसले कसे? या गोष्टींवर आता सरकारचे लक्ष नाही, पण त्यांच्यावर ज्यांनी विश्वास दाखवला त्यांच्यावर आता त्यांचे लक्ष आहे. ज्यांनी भाजपवर विश्वास दाखवला, त्या लोकांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. मुळात भाजप देशाचा तारणहार आहे असा समज करून देणे हाच एक प्रचंड मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यातून अनेकजण आता जागे होत आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मातोश्री निवासस्थानी ठाण्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. ठाण्यातील काही कार्यकर्ते गद्दारांसोबत गेले होते. ते परत आलेत. आजही काहीजण परत आलेत. थोडक्यात आता गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांच्यात आता अक्षरशः मारामारी व बाचाबाची सुरू आहे. त्याला कंटाळून किंवा त्यांचे खरे रूप समजल्यामुळे हे लोक पुन्हा शिवसेनेत येत आहेत. त्याचबरोबरीने भाजप व राष्ट्रवादीचे लोकही पक्षात येत आहेत. रोजच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत. याचे कारण असे की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पुढील महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होतील. आज सत्ताधारी पक्षांत हाणामाऱ्या जोरात सुरू आहेत. पैशांची उधळपट्टी सुरू आहे. तुम्ही एक-दोन दिवसांच्या दौऱ्यांसाठी किती कपडे नेणार? हेलिकॉप्टरमध्ये किती सामान नेता तुम्ही? काय करता काय? आता त्यांच्यातील लोकच त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. ज्यांच्यावर धाड टाकली त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण ज्यांनी धाड टाकली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. हे सर्व फार घाणेरड्या पद्धतीने होत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू यांच्यावरील धाडीवरून केली.

आपल्या देशात हे चित्र अपेक्षित नव्हते, पण हे लक्षात आल्यानंतर लोक शिवसेनेत (ठाकरे) परतत आहेत. आणखी अनेक लोक येत आहेत. थोडे संभ्रमात आहेत, भाजप देशाचा तारणहार आहे या संभ्रमातून अनेकजण जागे होत आहेत. उरलेल्या लोकांना शिवसैनिकांनी जागे करावे. आगामी मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच शिवसेनेचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button