…तर राजकीय संन्यास घेईन : राजेश सावंत

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर होत असलेल्या जातीय भेदभावाच्या आरोपांवर माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली. एका वादग्रस्त पत्रकासंदर्भात आपले नाव पत्रकार परिषदेत घेण्यात आल्यामुळे संताप व्यक्त करत, “जर हे पत्रक मी छापले असेल, तर मी त्वरित राजकीय संन्यास घेईन,” असे जाहीर आव्हान देत निवडणूक आयोगाकडे ‘सुमोटो’ तक्रार दाखल करून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली.

या पत्रकाची शहानिशा होणे आवश्यक आहे असे सावंत यावेळी म्हणाले. या प्रकरणी दिपक पटवर्धन आणि सचिन वहाळकर यांना विचारणा व्हावी, असेही ते म्हणाले.
“शहरात गरीब मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, काही ठिकाणी पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप आहे. मात्र, याचा परिणाम मतदानावर होणार नाही. मतदान प्रक्रिया भयमुक्त आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलून पोलीस बंदोबस्त ठेवावा,” अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

सावंत यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावरही टीका केली. पाणी योजना, भुयारी योजना, कचरा निर्मूलन, झोपडपट्टी विकास आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांची पूर्तता झालेली नाही. पालिकेत गेल्या ८ वर्षांत ८९ कोटींचा बॅकलॉग जमा झाला असून, नगरसेवकांनी नगरपालिका विश्वस्त म्हणून व्यवस्थित सांभाळली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button