
रत्नागिरी शहरातील परकार रुग्णालयाच्या डायलिसिस विभागाला शॉर्ट सर्किट आग
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध परकार रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले. आगीने डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोण निर्माण झाल्याने डायलिसिस विभागातील अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले.
सुरुवातीला आग छोटी असताना आगीवर नियंत्रण न मिळवल्याने आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. येथील रुग्णाला कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर ताबा मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर प्रयत्न करत होते.




