
लवेल परिसरात पुन्हा वणव्याचा भडका!
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी फाट्यानजीक गुरुवारी सायंकाळी वणवा लागल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी दुपारी लवेल गावाजवळील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत पुन्हा वणवा भडकल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाच्या निसर्ग माहिती केंद्राकडे जाणाऱ्या मार्गालगतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लवेल परिसरात नामांकित शीतपेय निर्मिती कंपनीसह कोकण रेल्वेचे काम करणाऱ्या कंपनीचा परिसर आहे. विशेष म्हणजे, वणवा लागलेल्या ठिकाणापासून रस्त्याच्या पलीकडे गॅस कंपनीदेखील आहे. त्यामुळे या भागात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे औद्योगिक परिसराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आगीचा फैलाव औद्योगिक आस्थापनांच्या दिशेने झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही दिवसांपूर्वीच वनविभागाच्या निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी या परिसरात १०० हून अधिक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, या निसर्गसंपन्न परिसरातच वारंवार वणवे लागत असल्याने वनसंपदेच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात विविध वन्यप्राण्यांचाही वावर आहे. त्यामुळे वणव्यांच्या घटनांमुळे दुर्मिळ वनस्पती जळून खाक होण्याबरोबरच वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगीच्या धुरामुळे आणि उष्णतेमुळे परिसरातील जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
एकीकडे निसर्ग माहिती केंद्राच्या माध्यमातून दुर्मिळ वनस्पती आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्याच परिसरात वारंवार वणवे लागत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आगी नेमक्या कशामुळे लागतात, याची चौकशी करून वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभाग आणि संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.




