कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेसाठी राज्यात विशेष मोहीम; २ कोटींपर्यंतच्या कर्जावर मिळणार ३% व्याज सवलत


​रत्नागिरी, दि. ३ ): राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (AIF) योजनेची राज्यात १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी आणि संस्थांनी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करावे, असे आवाहन कृषी संचालक (आत्मा), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.
​योजनेचे स्वरूप आणि फायदे
​ऑगस्ट २०२० मध्ये ‘आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश पीक कापणीनंतरच्या (Post-Harvest) व्यवस्थापनात सुधारणा करणे हा आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या रु. २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. लाभार्थ्यांना शासनामार्फत क्रेडिट गॅरंटीची (पत हमी) सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.
​ या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत आहे.
​गोदामे, शीतगृहे (Cold Storage), सायलो आणि रिपनिंग चेंबर, ​पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट्स, ​प्राथमिक प्रक्रिया केंद्रे आणि कृषी लॉजिस्टिक्स, ​ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट आणि कस्टम हायरिंग सेंटर यांना या योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली जाते.
​या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या / संस्था (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहाय्यता गट (SHGs) आणि कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्था घेऊ शकतात.
​या विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा पातळीवर व्यापक जनजागृती, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी व संस्थांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत/अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button