रत्नागिरी जिल्ह्यात १० डिसेंबरपर्यंत ‘स्वच्छ शौचालय गरिमामय भविष्य’ अभियान

रत्नागिरी : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ‘स्वच्छ शौचालय गरिमामय भविष्य’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांसह शाळा, अंगणवाडी आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांची स्वच्छता, सुरक्षितता व सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. महिला, विद्यार्थिनी आणि दिव्यांग व्यक्तींना स्वच्छतागृहांचा सुरक्षित व सुलभ वापर करता यावा, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या जागतिक शौचालय दिनाची संकल्पना ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ (Safe Toilets, Equal Futures) अशी आहे. या अनुषंगाने १९ नोव्हेंबरला जिल्हा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर अभियानाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर २० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
या पाहणीदरम्यान शौचालयांमधील पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक साहित्य, मलमूत्र व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेची तपासणी केली जाईल. आवश्यकतेनुसार शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. गावातील वैयक्तिक घरगुती शौचालयांची स्थिती तपासून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. एक खड्डा शौचालयांचे होणार अद्ययावतीकरण एक खड्डा शौचालयांचे दोन खड्ड्यांच्या शौचालयांमध्ये रूपांतर करण्यासह आवश्यकतेनुसार सेप्टिक टँक व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच मैला गाळ व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. शौचालयांमधील गाळाची यांत्रिक पद्धतीने सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. शाळा, अंगणवाड्यांमध्ये स्वच्छता परीक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांमधील शौचालयांचीही तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आणि साबणाने हात धुण्याबाबत जनजागृती करण्यात येईल. शालेय स्वच्छता परीक्षण आयोजित करून विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यात येणार आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शौचालयांचा सहज वापर करता यावा, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही सर्व गटविकास
अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट शौचालय स्पर्धेतून ग्रामपंचायतींचा गौरव या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक, सामूदायिक, संस्थात्मक आणि वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी उत्कृष्ट शौचालय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने उत्कृष्ट सार्वजनिक व संस्थात्मक शौचालयांसह उत्कृष्ट वैयक्तिक घरगुती शौचालयांची निवड करायची आहे. त्यानंतर पंचायत समिती स्तरावर उत्कृष्ट शौचालयांची निवड करून जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केले जातील. अभियानाच्या सांगता कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शौचालयांचा आणि संबंधित ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.
“स्वच्छता ही केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित नसून ती प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी, प्रतिष्ठेशी आणि सुरक्षिततेशी निगडित आहे. सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेऊन सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, नियमित देखभाल आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करावा. या मोहिमेत सहभागी व्हावे,” असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button