
खेडमध्ये ‘मिशन नेत्रा’ला घरघर; देखभाल-दुरुस्तीअभावी सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली!
लाखो रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा धूळखात; शहरातील प्रमुख चौकांमधील कॅमेरे बंद, लाऊडस्पीकरही निकामी
खेड : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने लोकसहभागातून उभारलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन नेत्रा’ प्रकल्पाला सध्या देखभाल-दुरुस्तीअभावी घरघर लागली आहे. शहरातील प्रमुख प्रवेशमार्ग आणि गजबजलेल्या चौकांमध्ये बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून, लाऊडस्पीकर यंत्रणाही धूळखात पडली आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या या यंत्रणेच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खेडमध्ये वाढती गुन्हेगारी, वाहतुकीचा वाढता ताण आणि पोलिसांचे मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेऊन सुमारे चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन नेत्रा’ हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगारीला आळा घालणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियंत्रण करणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश होता.
या प्रकल्पांतर्गत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहर पोलिसांच्या निगराणीखाली येऊन अप्रिय घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. या सामाजिक उपक्रमाला शहरातील अनेक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांनी सहकार्य केले होते. दुबईस्थित उद्योजक बशीर हजवानी यांनी हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच स्थानिक ठेकेदाराकडे यंत्रणा उभारणी आणि देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात या यंत्रणेचा चांगला उपयोग होत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिसांना मदत मिळत होती. एकाच ठिकाणी बसून विविध भागांतील हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होत होते. मात्र, कालांतराने देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ही यंत्रणा निष्क्रिय होऊ लागली.
सद्यस्थितीत बसस्थानक, निवाचा चौक, गांधी चौक, तीनबत्ती नाका यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेली लाऊडस्पीकर यंत्रणा बंद अवस्थेत आहे. अनेक सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. काही कॅमेऱ्यांभोवती पावसाळ्यात वेलींचे जाळे पसरले असून, काही ठिकाणी पावसामुळे कॅमेरे खराब झाल्याचे चित्र आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या यंत्रणेची अशी अवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि प्रवेशमार्गांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणे ही सध्याच्या काळातील सुरक्षेची महत्त्वाची गरज आहे. मात्र, ‘मिशन नेत्रा’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पच निष्क्रिय झाल्यास त्याचा फायदा असामाजिक प्रवृत्तींना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून अपेक्षित असलेली पोलीस निगराणी आणि सुरक्षा व्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकर आणि संपूर्ण यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच यंत्रणेच्या नियमित देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी, अशी आग्रही मागणी खेड शहरवासीयांकडून होत आहे.




