
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रेड्स ॲपच्या मदतीने परभणीतील खून प्रकरणाचा छडा
अनोळखी मृतदेहाच्या कवटीवरून एआय तंत्रज्ञानाद्वारे चेहरा पुनर्रचित करून पटवली ओळख

रत्नागिरी : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या एआय आधारित रेड्स ॲपच्या (RAIDS App) माध्यमातून रत्नागिरी पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा देण्यात यश मिळविले आहे.

९ मे २०२६ रोजी दैठणा पोलीस ठाणे (जि. परभणी) हद्दीतील जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे परभणी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

या तपासादरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या एआय आधारित रेड्स ॲपचा वापर करण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची प्रतिमा (Face Reconstruction) पुनर्रचित करण्यात आली. हे पुनर्रचित छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटील यांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याबाबत परभणी जिल्हा पोलीस दलास मार्गदर्शन करण्यात आले.
या तांत्रिक प्रक्रियेमुळे या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. मृत व्यक्तीचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असे निष्पन्न झाले. पुढील तपासात या खूनप्रकरणी मृत व्यक्तीचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले व भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोन आरोपींना परभणी पोलीस दलामार्फत ताब्यात घेण्यात आले असून, दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
अशा प्रकारे पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एआय आधारित रेड्स ॲपच्या माध्यमातून कवटीच्या रचनेवरून चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यास मदत झाली.




