मार्लेश्वर दुर्घटनेची सखोल चौकशी करा; भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या!

चिमुकली ऋत्वीच्या मृत्यूने व्यथित; मी तिच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी – आमदार शेखर निकम

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून सांगली येथील सहा वर्षीय ऋत्वी पाटील या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेमुळे मनाला मोठी वेदना झाली असून, पाटील कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी गुरुवारी देवरूख येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

देवरूख येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या दुर्घटनेनंतर आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने माहिती घेत होतो. तसेच प्रशासनाशीही संपर्कात होतो. मात्र, प्रकृती ठीक नसल्यामुळे तातडीने घटनास्थळी जाता आले नाही, असे आमदार निकम यांनी स्पष्ट केले.

मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. अशा पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. देवदर्शनासाठी आनंदाने आलेल्या पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे निकम यांनी सांगितले.

मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना भाविकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होता कामा नये. डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसर असल्याने संभाव्य धोकादायक ठिकाणांची प्रशासनाने पाहणी करणे आवश्यक आहे. दर्शनमार्गावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यक संरक्षक उपाययोजना कराव्यात. तसेच सूचना फलक लावणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्राच्या विकासकामांमध्ये परिसराची नैसर्गिक रचना, डोंगराची स्थिती आणि पर्यावरणाचा विचार करणे अत्यावश्यक आहे. विकासकामांमुळे भाविकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. प्रशासन, बांधकाम विभाग आणि अन्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार निकम यांनी केली.

या पत्रकार परिषदेला उपसभापती प्रफुल्ल बाईत, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, नगरसेवक यशवंत गोपाळ, नगरसेवक दीपक खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक बाळू ढवळे, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, देवरूख शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, नितीन भोसले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, अनंत जाधव, पंकज पुसाळकर, अरुण किर्वे, विकास राठोड, मोहन हजारे, रामू पंदेरे आदी उपस्थित होते.

ऋत्वी पाटील या चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या दुर्घटनेतून प्रशासनाने योग्य तो धडा घेऊन मार्लेश्वर येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button