
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा रत्नागिरी दौरा; ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा आढावा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा होणार गौरव
रत्नागिरी, दि. ६ ): राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘चला शाळेत जाऊया’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान शिक्षण मंत्री जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन भौतिक पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचा गणवेश, पोषण आहार, दत्तक शाळा उपक्रम, तसेच गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पीजीआय (PGI), एसडीजी (SDG), ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान आणि इतर महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांचा सखोल आढावा घेणार आहेत. या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
आदर्श कामगिरी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्या, गुणवंत विद्यार्थी आणि ‘आयडॉल’ शिक्षकांचा मंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डाॕ उदय सामंत उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी दिली आहे.




