महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी..!

  • वातावरणात जाणवतोय कमालीचा बदल
  • देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी जाण्याची शक्यता
  • राज्यात तापमान वाढले

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (दि.8) महाराष्ट्राच्या उर्वरित भागातूनही माघार घेतली.

त्यामुळे संपूर्ण राज्यातून मान्सूनची एक्झिट झाली आहे. गोवा, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडच्या काही भागांतूनही मान्सून परतला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात शनिवारी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णेपर्यंत पोहोचलेली परतीची रेषा बुधवारी स्थिर होती. त्यामुळे मान्सूनची माघार काहीशी रेंगाळली. मात्र, गुरुवारी उर्वरित महाराष्ट्रातूनही मोसमी वारे परतले. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात पावसाची मोठी तूट नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने या महिन्यात तब्बल ५२ टक्के तूट राहिली. संपूर्ण मोसमी हंगामात राज्यात १९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे.

राज्यात तापमान वाढले

राज्यात 19 टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्‌यातील बहुतांश जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एल निनोचा प्रभाव, पावसाचा अभाव आणि ऑगस्टपासून पावसाने दिलेली ओढ यामुळे यंदाच्या हंगामात राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे

मान्सूनच्या माघारीनंतर राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे झाले आहे. काही ठिकाणी कमाल तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कोकणातही तापमान वाढले आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान पुन्हा बदलणार

देशातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरत असतानाच हवामानात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम भारतावर नव्या पश्चिमी विक्षोभाचा (Western Disturbance) प्रभाव पडणार आहे. त्यामुळे ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी या भागांत तापमान वाढताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button