
भरणे-बाईतवाडीत दिवसाढवळ्या दोन बंद घरे फोडली
८ लाखांचे दागिने व रोकड लंपास; अवघ्या तासाभरात चोरट्यांचा पोबारा
खेड : तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील आदित्य रेसिडेन्सीमधील दोन बंद घरे चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडून सुमारे ७ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची धाडसी घटना बुधवारी (ता. ७) घडली. दुपारी १२.१५ ते १.२५ या अवघ्या तासाभराच्या कालावधीत ही घरफोडी झाली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय सहदेव देसाई (वय ४९, मूळ रा. भडगाव, सध्या रा. भरणे-बाईतवाडी) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य रेसिडेन्सीमधील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये राहणारे देसाई दुपारी घर बंद करून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी व कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्याने शेजारील फ्लॅट क्रमांक १०३ मध्येही प्रवेश केला. या फ्लॅटचे मालक मिलिंद तुकाराम अदावडे यांच्या घराचा दरवाजा व कुलूप तोडून चोरट्याने दोन्ही घरांमधील मौल्यवान ऐवज लंपास केला.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे दीड तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन (२ लाख २० हजार रुपये), दोन सोन्याचे ब्रेसलेट (२ लाख ६० हजार रुपये), दोन जोड सोन्याच्या अंगठ्या (१ लाख १० हजार रुपये), सोन्याचा हार (१ लाख रुपये), तीन सोन्याची नाणी (२ लाख रुपये), सोन्याचे टॉप्स (२० हजार रुपये), सोन्याची बाळी (१० हजार रुपये), सोन्याची नथ (२५ हजार रुपये), चांदीचे दागिने व कंबरपट्टा (४० हजार रुपये) तसेच १० हजार रुपये रोख, असा ऐवज चोरीस गेला आहे.
मुख्य वस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे भरणे-बाईतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. खेड पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.




