
आता मुंबई बंद होणार, सेनाभवनासमोर आदित्य- तेजस ठाकरे पोलिसांना भिडले
मुंबईत रविवारी (11 ऑक्टोबर) कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धरपकड सुरु केली होती. पण, यावेळी शिवसेना भवनासमोर ठाकरेंचे शिवसैनिक आणि मुंबई पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याचे समोर आले. यावेळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे थेट पोलिसांना भिडल्याचे समोर आले. यावेळी, दोघांनी शिवसैनिकांसोबत शिवसेना भवनासमोर आंदोलन करत मुंबई पोलिसांचा आणि भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी, आदित्य ठाकरे थेट पोलीस गाडीवर चढल्याचे दिसून आलेकॉक्रोच जनता पार्टीकडून मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथे आंदोलनाची हाक देण्यात आली. रविवारी (11 ऑक्टोबर) शिवाजी पार्क मैदानात आंदोलन आयोजित करण्यात आले. पण, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा शिवाजी पार्क मैदानात तैनात होता. शिवसेना भवन समोर शिवाजी पार्क मैदानाकडे जाणाऱ्या रस्ता पोलिसांनी अडवला. तसेच शिवाजी पार्कच्या दिशेला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून पोलीस फौजफाटा तैनात केला. तरीही आंदोलकांनी हार न मानता शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली.शिवसेना भवन परिसरात शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत याआधीच उपस्थित होते. तसेच दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. पोलिसांकडून केल्या जात असणाऱ्या कारवाईचा जाब विचारण्यासाठी अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गेले. तर दुसरीकडे शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर आले. यावेळी, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे तिथे आले आणि तिथेच रस्त्यावर ठिय्या मांडून बसले. यावेळी, परिसरात चांगलेच वातावरण तापले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अनिल परब आणि महेश सावंत यांच्यासह अनेक उबाठाचे पदाधिकारी नेते उपस्थित आहेत.
आदित्य ठाकरेंनी दिली शिवाजी पार्कात येण्याची हाक
शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरेंनी यावेळी राज्य सरकारवर आणि मुंबई पोलिसांवर सडकून टीका केली. यावेळी, आता मुंबई पोलिसांमुळेच मुंबई बंद होणार, जो जिथे असेल तिथून सर्वांनी शिवाजी पार्क येथे यावे, असे आवाहनही आदित्य ठाकरेंनी यावेळी केले आहे. “मुंबई पोलीस हे थेट शिवसेना भवनात शिरले. आम्ही गरज पडली तर मुंबईसह महाराष्ट्रही बंद पाडू. तरुणांबद्दल सरकारच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुंबई पोलिसांची वागणूक ही दिल्ली पोलिसांसारखी झाली आहे. आता सर्वांची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. उद्या आणखी आंदोलन चिघळणार आहे,” असा इशारा आदित्य ठाकरेंनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.





