
मोकाट गुरांचा तिसरा लिलावही निष्फळ
शहरातील मोकाट गुरांच्या बिकट समस्येवरून पालिका प्रशासनाची कोंडी सातत्याने वाढत चालली आहे. शहरात पकडण्यात आलेल्या ७६ मोकाट गुरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर परिषदेने राबवलेले सर्व प्रशासकीय उपाय आता पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. नगर परिषदेने १ सप्टेंबर रोजी आयोजित केलेला गुरांचा तिसरा लिलावही खरेदीदारांअभावी पूर्णपणे निष्फळ ठरला आहे. नगर परिषद प्रशासनासमोर या जनावरांच्या देखभालीचा आणि सुरक्षेचा गंभीर पेच निर्माण झाला आहे. गुरांना एखाद्या गोशाळेत हलविण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.
उप मुख्याधिकारी मयूर बेहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता नगर परिषद या ७६ गुरांना योग्य गोशाळेत हलवण्याच्या तयारीत आहे. यासाठी प्रशासनाकडून सध्या चांगल्या आणि सक्षम गोशाळेचा शोध घेतला जात असून, गोशाळा निश्चित होताच ही सर्व गुरे तेथे रवाना केली जातील. हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी पशुवैद्यकीय अधिकार्यांमार्फत गुरांच्या वैद्यकीय तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीअंती ७६ गुरांपैकी ४७ गुरे गोशाळेपर्यंतच्या प्रवासासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे शारीरिकदृष्ट्या पशुवैद्यकीय अधिकार्यांनी प्रमाणित केले आहे. उर्वरित गुरांची वैद्यकीय तपासणी आगामी काळात केली जाणार असून, ती पूर्ण झाल्यावर त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
वास्तविक पाहता, रत्नागिरीतील रस्त्यांवर, मुख्य चौकात आणि आठवडा बाजारासारख्या गर्दीच्या ठिकाणी मोकाट गुरांनी नागरिकांवर हल्ला करण्याच्या आणि अपघातांच्या घटना वाढल्याने प्रशासनाने ही गुरे पकडण्याची मोहीम राबवली होती. परंतु, गुरे पकडण्यापासून ते त्यांच्या लिलावापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नगर परिषदेला अपयशाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी वन विभागाच्या भूल तज्ज्ञांच्या मदतीने गनचा वापर करून आक्रमक गायीला भूल देण्याचा प्रयोग केला होता, मात्र दोनदा मुलीचे औषध मारूनही गाय बेशुद्ध पडली नव्हती. त्यानंतर तीन वेळा काढल्या निविदांनाही प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी प्राणी मित्र संस्थांच्या माध्यमातून मार्ग काढण्याचे संकेत दिले होते.




