
मुंबई-वेंगुर्ला रो-रो सेवेसाठी हालचालींना वेग; वर्षभरात सेवा सुरू होण्याची शक्यता
विजयदुर्ग, मालवण थांबे प्रस्तावित; वेंगुर्ला जेट्टीचे ४० टक्के काम पूर्ण | चार कंपन्या इच्छुक, परवडणाऱ्या तिकीट दरांचा विचार
मुंबई : मुंबई आणि कोकणादरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी बंद पडलेली रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यावेळी मुंबई ते वेंगुर्ला या मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र सागरी मंडळाने केले असून, या मार्गाच्या व्यवहार्यतेची तपासणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या सेवेसाठी चार कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली असून, निविदा प्रक्रियेनंतर संबंधित कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या गणेशोत्सव, शिमगा आणि अन्य सणांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वे, एसटी आणि महामार्गावरील वाहतुकीवर मोठा ताण येतो. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे तसेच पावसाळ्यातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे रस्त्याने कोकण गाठण्यासाठी प्रवाशांना मोठा वेळ खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रो-रो सेवा हा जलद पर्याय ठरू शकतो.
विजयदुर्ग रो-रो प्रयोगाला अपेक्षित प्रतिसाद नाही
यापूर्वी महाराष्ट्र सागरी मंडळाने १ मार्चपासून मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू केली होती. ६२६ प्रवासी क्षमतेची ‘एम टू एम प्रिन्सेस’ बोट या मार्गावर धावत होती. मात्र, तुलनेने जास्त तिकीट दर आणि त्यानंतर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
या सेवेदरम्यान महिनाभरात केवळ १२ फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमधून ८९४ प्रवाशांनी प्रवास केला, तर केवळ १५४ वाहने वाहून नेण्यात आली. प्रवाशांसाठी तीन हजारांपासून नऊ हजार रुपयांपर्यंत, तर वाहनांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात आले होते. त्यामुळे विमानसेवा आणि वंदे भारतच्या तुलनेत ही सेवा महाग असल्याची टीका झाली होती.
तांत्रिक बिघाडानंतर सेवा दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप ही सेवा पूर्ववत झालेली नाही.
आता थेट वेंगुर्ल्यापर्यंत रो-रो
नव्या प्रस्तावानुसार मुंबई-वेंगुर्ला रो-रो सेवेत विजयदुर्ग आणि मालवण हे थांबे असण्याची शक्यता आहे. मुंबई ते वेंगुर्ला हा प्रवास रो-रोद्वारे साधारण सात ते आठ तासांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या सेवेसाठी वेंगुर्ला येथे जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सुरू असून, आतापर्यंत सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चार कंपन्या सेवेसाठी इच्छुक
रो-रो सेवा चालविण्यासाठी चार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यांच्या प्रस्तावांचा विचार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि सेवा प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी सुमारे वर्षभराचा कालावधी लागू शकतो.
तिकीट दर परवडणारे ठेवण्यावर भर
मागील रो-रो सेवा महागड्या तिकीट दरांमुळे प्रवाशांमध्ये फारशी लोकप्रिय ठरली नव्हती. त्यामुळे यावेळी तिकीट दर हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
“मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा सुरू करण्यासाठी चार कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. व्यवहार्यता तपासणी सुरू असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ही सेवा लवकरात लवकर सुरू केली जाईल. प्रवाशांना परवडणारे तिकीट दर असावेत, याचाही विचार केला जाईल,” अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांनीही मुंबई-कोकण रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता मुंबई-वेंगुर्ला रो-रो सेवा प्रत्यक्ष कधी सुरू होते आणि यावेळी तिकीट दर किती ठेवले जातात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे




