
मुंबई-गोवा महामार्गावर भाड्याने घेतलेल्या कारचालकावर प्रवाशांकडून चाकूने हल्ला
राजापूर गोव्याला जाण्यासाठी भाड्याने घतलेल्या कारच्या चालकाला बेदम मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीतील हुंबरठ येथे घडली. या घटनेत राजापुरातील वाहन चालक रेहान इकबाल सय्यद (३२, रा. वाघूवाडा, राजापूर, जि. रत्नागिरी) गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर तिन्ही प्रवासी कार घटनास्थळीच सोडून पसार झाले असून या प्रकरणी कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरातील रेहान इकबाल सय्यद यांच्याकडे तीन अनोळखी प्रवासी आले. आपल्याला गोव्याला जायचे असून त्यासाठी भाड्याने कार हबी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार रेहान यांनी आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार भाड्याने दिली. तिन्ही प्रवाशांना घेऊन रेहान है सत्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास राजापूर येथून गोव्याच्या दिशेने निघाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथे रेहान यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली.
यावेळी कारमध्ये असलेल्या तिन्ही प्रवाशांनी कार आपण चालवतो, असे रेहान यांना सांगितले. मात्र, रेहान यांनी कार आपणच चालवणार असल्याचे सांगत कार चालविण्यास देण्यास नकार दिला. यावरून हाणामारी होऊन तिन्ही प्रवाशांनी रेहान यांना बेदम मारहाण केली. त्यातील एका प्रवाशाने रेहान यांच्यावर चाकूने वार केले या हल्ल्यात रेहान जखमी होऊन रस्त्यावर पडले. हल्लेखोरांनी रेहान यांना आणि कारला घटनास्थळीच सोडून पलायन केले.




