दिलेला शब्द पाळणारा आमदार; भिले-मधलीवाडी ग्रामस्थांकडून शेखर निकम यांचा सत्कार

वर्षभरात विकासकामे पूर्ण करण्याची ग्वाही; विसर्जन घाट दुरुस्तीला तात्काळ मंजुरीचे आश्वासन

चिपळूण : प्रतिनिधी — बोलण्यापेक्षा कामातून विकास दाखविण्याच्या भूमिकेतून भिले-मधलीवाडीतील विकासकामांना सातत्याने पाठबळ देणारे आमदार शेखर निकम यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाडीतील नूतन सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर आमदार निकम यांनी सभागृहाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत विकासकामांसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

मधलीवाडीतील गणपती विसर्जन घाटाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार निकम यांनी यावेळी दिले. घाट दुरुस्तीला तात्काळ मंजुरी देण्यासह रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि अन्य प्रस्तावित विकासकामे वर्षभरात पूर्ण करून देण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

भिले-कळुस्ते खारभूमी विकास योजनेसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती निकम यांनी दिली. भिले गावातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, गावाच्या गरजा लक्षात घेऊन यापुढेही विकासकामे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषणाचा खाडीपट्ट्यातील आंबा-काजू बागायतींवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. या परिणामांचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाशी चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार निकम यांनी दिली.

ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मण रेवाळे यांनी प्रास्ताविकातून मधलीवाडीतील विकासकामांचा आढावा घेतला. पूर्ण झालेली, सुरू असलेली तसेच प्रस्तावित कामांची माहिती देताना त्यांनी आमदार निकम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग माळी, उपसरपंच उमेश सकपाळ, केतकीचे उपसरपंच प्रदीप घाडगे, प्रभाकर सैतवडेकर, विजय दिवेकर, लक्ष्मण रेवाळे, प्रशांत ठाकूर, भिले कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष सुरेश भुवड, भिले कुणबी समाज स्थानिक मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताराम घरवे, भिले देवस्थान अध्यक्ष दत्ताराम नवेले, मनोहर भुवड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. राकेश आदवडे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button