
तब्बल 400 दिवसांनंतर ‘माधुरी’ परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत
नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची बहुचर्चित माधुरी हत्तीण (ता.१२) मध्यरात्री १२.४० वाजता ११६० किमीचा प्रवास करून गावात पोहोचली आणि ‘माधुरी’प्रेमींकडून जल्लोष साजरा करताना अनेकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे वाहनांच्या ताफ्यातून आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात माधुरीची तब्बल चारशे दिवसांनंतर नांदणी गावात दिमाखदार स्वागताने घरवापसी झाली. यावेळी फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता गुजरातमधील वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रातून माधुरी हत्तीणीची ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून रवानगी झाली. ही वाहने व वनताराचे अधिकारी, कर्मचारी प्रवास करत बडोदा, सुरत, वापी, नवसारी, वसई, विरार, ठाणे, पुणे, सातारा, कऱ्हाडमार्गे नांदणी मठात तीस तासांनंतर माधुरी हत्तीण दाखल झाली.
माधुरी हत्तीणीची वाहने नांदणी येथील चौकात आल्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण केली. माधुरी हत्तीणीचे जल्लोषात स्वागत करीत असताना महिला, वृद्ध, लहान मुले, नागरिकांना आनंदाश्रू अनावर झाले. स्वागतावेळी फक्त नांदणी नव्हे, तर कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यांतील हजारो सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते. नांदणीतील प्रमुख मार्गांवरून माधुरीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या. यातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाहने निशिधीका येथे दाखल झाली. यावेळी वनतारा, वनविभाग, आरोग्य पथक यांच्या उपस्थितीत माधुरीला सुरक्षितरित्या वाहनातून खाली उतरवण्यात आले.त्यानंतर निशिधीका परिसरात तयार केलेल्या माधुरी निवासाच्या रस्त्याच्या दुतर्फा केळीचे घड, पपई, बीट, सफरचंद, संत्री, मोसंबी, उसाच्या कांड्या, गवत, उसाचा चारा, कलिंगड, विविध प्रकारच्या भाज्या, केळीचे लहान खूप असे खाद्यपदार्थ ठेवले होते. नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरुर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी माधुरीचे स्वागत केले. त्यानंतर माधुरीला आपल्या हक्काच्या निवासस्थानात आणण्यात आले. माधुरी हत्तीणीची पुनरागमन झाल्याने नागरिक माधुरीचे क्षण मोबाइलमध्ये टिपण्यासाठी धडपडत होते. २५ हून अधिक पोलिस अधिकारी, १०० कर्मचारी, ५० हून अधिक होमगार्ड यांचा बंदोबस्त होता.




