
गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात; रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा
पंपांवर २ ते ३ किलोमीटरच्या रांगा; चारचाकी आणि रिक्षाचालकांना तासनतास प्रतीक्षा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, वाढलेल्या वाहनसंख्येच्या तुलनेत सीएनजीचा पुरवठा अपुरा पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी या रांगा तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पोहोचल्याने वाहनचालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. काही प्रवासी रेल्वे आणि एसटीचा आधार घेत असले, तरी मोठ्या संख्येने नागरिक खासगी चारचाकी वाहनाने कोकणात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली असून सीएनजी वाहनधारकांचीही संख्या मोठी आहे.
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध सीएनजी पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनचालकांना लांब रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांचा वेळ वाया जात आहे. चाकरमानी, नोकरदार, पर्यटक तसेच रिक्षाचालकांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार असल्याची पूर्वकल्पना प्रशासनाला असतानाही सीएनजीच्या मागणीचा योग्य अंदाज घेऊन पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. ऐन सणासुदीत इंधनासाठी अशा प्रकारे रांगा लागणे ही वाहनचालकांसाठी मोठी गैरसोय ठरत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे यंदाही सणाच्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा पुरेसा साठा आणि नियमित पुरवठा राहील, यासाठी प्रशासन व संबंधित पंपचालकांनी आधीच नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सीएनजीचा पुरवठा सुरळीत करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, तसेच गणेशोत्सवाच्या उर्वरित काळात सीएनजीचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे




