
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा, झाडी हटवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा!
खेडच्या रस्त्यांच्या दुरावस्थेवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला धरले धारेवर
खेड : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खेड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मोठमोठे खड्डे, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी, रखडलेली कामे आणि वाहतूक कोंडी या प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.
पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, वाढलेली झाडी हटवावी आणि रखडलेली कामे पूर्ण करून चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. या काळात रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असताना तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते, असा मुद्दा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
“आम्ही तर या खड्ड्यांमधून नेहमीच प्रवास करतो; मात्र बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना किमान गणेशोत्सवाच्या काळात तरी सुरक्षित आणि व्यवस्थित रस्ते मिळाले पाहिजेत,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
खेड-दापोली मार्गाच्या सुरू असलेल्या कामावरही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. या रस्त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, अंदाजे ९० ते १०० कोटी रुपयांचा निधी या मार्गासाठी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
इतका मोठा निधी उपलब्ध असताना रस्त्याचे काम दर्जेदार, नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही ठिकाणी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँक्रीट टाकल्यानंतर पृष्ठभाग व्यवस्थित समतल करण्याची आवश्यकता असताना काही ठिकाणी कामाच्या पद्धतीबाबत नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
खेड शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामावरूनही शिवसेना ठाकरे गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. कन्याशाळेपासून पुढे शीतल हॉटेल परिसरापर्यंतच्या रस्त्यावर दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला.
काही ठिकाणी रस्त्याची रुंदी अपुरी असल्याने वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित जागा नगरपालिकेकडून अद्याप उपलब्ध झालेली नसल्याचे सांगितले जात असेल, तर रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक ती जागा आणि रुंदी निश्चित करण्याचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
“आजपर्यंत सुदैवाने मोठी दुर्घटना घडलेली नाही. मात्र उद्या एखादा अपघात झाला, कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का?” असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, झाडी कटिंग करणे, धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे आणि रखडलेली कामे पूर्ण करणे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
विशेषतः गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना आणि चाकरमान्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे, तालुकाप्रमुख सचिन निकम, शहरप्रमुख शेखर पाटणे, बेलोसे मॅडम, अंकुश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक बांधकाम विभाग या मागण्यांवर कितपत तत्परतेने कार्यवाही करतो आणि खेड तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे व झाडी प्रत्यक्षात हटवली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




