डीबीजेच्या एनसीसी छात्रांची ऐतिहासिक कामगिरी; ‘थल सैनिक कॅम्प’साठी तिघांची निवड

चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या छात्रांनी ऐतिहासिक कामगिरी करत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘थल सैनिक कॅम्प (टीएससी), दिल्ली’साठी निवड मिळविली आहे. महाविद्यालयातील टी.वाय. बी.कॉमचा राज कदम, एस.वाय. बायोटेकचा श्रेयस मानकर आणि एस.वाय. डेटा सायन्सचा अथर्व कदम या तीन छात्रांची १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराडच्या वतीने या प्रतिष्ठित कॅम्पसाठी निवड झाली आहे. डीबीजे महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच ‘थल सैनिक कॅम्प’साठी एकाचवेळी तीन छात्रांची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, गेली सलग तीन वर्षे डीबीजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीएससी कॅम्प, दिल्लीसाठी निवड होत असून, यंदा एकाचवेळी तीन छात्रांनी निवड मिळवत ही कामगिरी अधिक संस्मरणीय केली आहे. अशा प्रकारे १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड या युनिटने यावर्षी थल सैनिक कॅम्पसाठी निवडीची हॅट्ट्रिक साधली आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी हे तिन्ही छात्र टीएससी कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी अमरावती येथून दिल्लीकडे प्रयाण करत आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन मंगेश तांबे, सेक्रेटरी अतुल चितळे, नियामक समिती सदस्य, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले तसेच रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांनी तिन्ही छात्रांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय कुमार सिंह, ॲडम ऑफिसर कर्नल के. पद्मनाभन, एनसीसी ऑफिस, कराड येथील सर्व पीआय स्टाफ तसेच मेजर नम्रता माने आणि लेफ्टनंट मधुसूदन माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button