
कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले; संतापजनक व्हिडीओ व्हायरल
मिरकरवाड्यातील धक्कादायक प्रकार; तरुणाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, प्राणीप्रेमींचा कठोर कारवाईचा आग्रह
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात मुक्या प्राण्यांवर अमानुष वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण कुत्र्यांना दुचाकीला बांधून ओढत नेत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार पाहून एका महिलेने संबंधित तरुणांना जाब विचारला. “कुत्र्यांना अशाप्रकारे फरफटत नेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे,” असे म्हणत महिलेने तरुणांना सुनावले.
मात्र, महिलेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी संबंधित तरुणांनी तिच्याशी हुज्जत घालत आरडाओरड आणि शिवीगाळ केल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू झाली.
दरम्यान, या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. या प्रकरणी कामरान मुजगावकर (रा. मिरकरवाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमीही पोलीस ठाण्यात दाखल झाले. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे अमानुष वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे “मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे” हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणातील पुढील पोलिसी कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




