
शेताच्या बांधावर वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती रामदास कदम; शेतकरी महिलांसोबत केली भात लावणी

खेड : कोकणातील शेती संस्कृतीशी असलेले आपले नाते जपत वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती रामदास कदम यांनी आज खेड तालुक्यातील जामगे येथे शेतकरी महिलांसोबत भात लावणीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम यांनी शेतीप्रती असलेली आपली जिव्हाळ्याची भावना पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावातील शेतात आज पारंपरिक पद्धतीने भात लावणीचा उत्साह पाहायला मिळाला. वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती कदम यांनी शेतकरी महिलांसोबत खांद्याला खांदा लावून भात लावणीची कामे केली. भाताची रोपे काढण्यापासून ते प्रत्यक्ष लावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी पारंपरिक कोकणी लोकगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शेतकरी महिलांसोबत गाणी म्हणत आणि संवाद साधत ज्योती कदम यांनी श्रमसंस्कार व ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवला.

याचबरोबर त्यांनी ट्रॅक्टर चालवून शेतीकामांमध्येही सहभाग नोंदवला. शेती आणि मातीशी असलेली आपली घट्ट नाळ जपत ज्योती कदम दरवर्षी भात लावणीत सहभागी होतात. त्यामुळे स्थानिक शेतकरी महिलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शेती हा केवळ व्यवसाय नसून आपल्या संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे, याची प्रचिती आजच्या या भात लावणी कार्यक्रमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली.



