
रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारे डॉ. यळगुडकर वैद्यकीय क्षेत्रासाठी आदर्श : सुरेश सप्रे
४३ वर्षांच्या सेवाभावी कार्याचा पत्रकार संघातर्फे गौरव; ‘नव्या पिढीने डॉ. यळगुडकरांचा आदर्श घ्यावा’
संगमेश्वर : “आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक कारणांमुळे बदलला असला, तरी पैशापेक्षा रुग्णाच्या जीवाला प्राधान्य देणाऱ्या डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीने त्यांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श घेऊन काम करावे,” असे प्रतिपादन संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांनी केले.
‘हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेने गेली ४३ वर्षे सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. हॉटेल सनराईजच्या सभागृहात झालेल्या या सन्मान सोहळ्यात सुरेश सप्रे बोलत होते.
ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अत्यल्प असतानाच्या काळात डॉ. यळगुडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचून सेवा दिली. रुग्णाकडे उपचारासाठी पैसे आहेत की नाही, यापेक्षा त्याच्यावर प्रथम उपचार करणे आणि त्याचा जीव वाचवणे याला त्यांनी कायम प्राधान्य दिले. अनेक गरजू रुग्णांना उपचारांसाठी तसेच प्रवासासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली.
“रुग्ण हा केंद्रबिंदू मानून सेवा कशी करावी, याचा आदर्श डॉ. यळगुडकर यांनी आपल्या चार दशकांच्या कार्यातून निर्माण केला आहे. त्यांचे कार्य केवळ वैद्यकीय सेवा नसून माणुसकीची सेवा आहे,” असे संजय सप्रे यांनी सांगितले.
संगमेश्वर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन डॉ. यळगुडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला, ही बाब त्यांच्या सेवाकार्याची व्याप्ती आणि समाजातील त्यांच्या विषयीचा आदर अधोरेखित करणारी असल्याचेही सप्रे यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर, डॉ. चंद्रकांत यळगुडकर, त्यांच्या पत्नी सौ. नेहा यळगुडकर, बंधू डॉ. माधव यळगुडकर, सौ. मानसी यळगुडकर तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




