ऑक्टोबरमध्ये एसटीच्या तोट्यात १५० कोटी रुपयांची वाढ


आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती ऑक्टोबर महिन्यात गंभीर झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये एसटीच्या तोट्यात १५० कोटी रुपयांची वाढ झाली असून, एकूण तोटा २४० कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.त्यामुळे एसटीचा दैनंदिन तोटा सात कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

व्यवस्थापनाचे चुकीचे धोरणात्मक निर्णय आणि नियोजनशून्य कारभारामुळे एसटीच्या संकटात भर पडत असून, जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. एसटी नफा-तोट्याच्या गणितावर चालत नसली, तरी सरकार अपेक्षित मदत करायला तयार नाही. सरकारने निधी न दिल्याने सात हजार कोटी रुपयांची देणी थकली आहेत. त्यामुळे महामंडळ स्तरावरही उत्पन्नवाढीसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. पण ते होताना दिसत नाही.

तोटा वाढण्यासाठी १ ऑक्टोबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची करण्यात आलेली सक्ती हा प्रमुख मुद्दा असला, तरी महामंडळ स्तरावरही नियोजन करण्यात व्यवस्थापनाला अपयश येत आले असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट कार्डची उपलब्धता आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही सक्ती लागू करण्यात आली.राज्यातील केवळ ४३ टक्के महिलांकडेच एनसीएमसी स्मार्ट कार्ड असताना उर्वरित महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, महिला प्रवाशांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनीही एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button