
राष्ट्र सेविका समिति तर्फे १६ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत ‘स्वर तरंगिणी’ घोष वादनाचा भव्य कार्यक्रम
रत्नागिरी:
राष्ट्रसेविका समिती, कोकण प्रांत – दक्षिण रत्नागिरीच्या वतीने 90 वर्षपूर्तीनिमित्त ‘स्वर तरंगिणी’ या घोष वादनाच्या विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या ऐतिहासिक पतितपावन मंदिर प्रांगण, रत्नागिरी येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम एकाच वेळी संपूर्ण कोकण प्रांतात साखळी पद्धतीने आयोजित केला जात असून राष्ट्र सेविका समितीच्या शिस्तबद्ध घोष वादनाची प्रचीती या कार्यक्रमातून उपस्थितांना येणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ. विनया विराज परब (M.A. संगीत) उपस्थित राहणार असून, दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हा सेवा प्रमुख डॉ. सौ. रंजना संजय केतकर या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ज्या नागरिकांना प्रत्यक्षात उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ‘समिती संवाद कोकण प्रांत’ या अधिकृत फेसबुक पेजवरून सायंकाळी 4.30 ते 6.10 या वेळेत थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तरी सर्व नागरिक, देशभक्त व संगीतप्रेमींनी या स्फूर्तीदायक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण रत्नागिरीच्या कार्यवाहिका सौ. मीरा मोहन भिडे व रत्नागिरी तालुका कार्यवाहिका सौ. शमिका संजय गद्रे यांनी केले आहे.




