
भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा; सुभाष देसाईंचे सूचक वक्तव्य
चिपळूण : शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, “भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे,” असे सूचक वक्तव्य केले. जाधव यांनी तळागाळापासून पक्षासाठी काम केले असून, संघर्ष करत संघटना मजबूत केली आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळाल्यास आनंद होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला भास्कर जाधव, उपनेते विजय कदम यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भास्कर जाधव यांच्याकडे केवळ रत्नागिरी किंवा कोकणाची जबाबदारी नसून, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचे देसाई यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले.
कोकणात ठाकरे शिवसेनेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, पदाधिकारी बैठकीला झालेली मोठी उपस्थिती त्याचे द्योतक आहे, असा दावा देसाई यांनी केला. आगामी तीन वर्षांत संघटना अधिक मजबूत करून महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी देसाई यांनी राज्यातील उद्योगांवरून सरकारवरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील उद्योग तसेच विस्तार प्रकल्प इतर राज्यांकडे वळत असल्याचा आरोप करत, उद्योग टिकवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे देसाई यांनी सांगितले. आपल्याला व्यापक राजकारणाकडे लक्ष द्यायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून घडलेला शिवसैनिक आजही खंबीर आहे. जनतेच्या मनात खदखद असून राजकीय वातावरण बदलत आहे. आगामी काळात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडतील आणि महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.




