
फळपीक विमा योजनेतून कोकणच्या बागायतदारांना मोठा दिलासा
हवामानातील सततचे बदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळामुळे फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतून मोठा दिलासा मिळाला आहे. आंबिया बहार २०२४-२५ हंगामातील नुकसानग्रस्त तब्बल ३५ हजार ३४७ शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट १०७ कोटी ३५ लाख रुपयांची नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा लागवडीखाली ६८ हजार ५५० हेक्टर, तर काजू लागवडीखाली १ लाख १२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्र आहे. हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे या प्रमुख फळपिकांचे वारंवार नुकसान होत असल्याने शासनामार्फत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना शेतकर्यांसाठी महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरत आहे.




