
प्रशासनाची बंदी असतानादेखील पानवल धबधब्यावर पर्यटकांची बिनधास्त स्टंटबाजी
रत्नागिरी सुरक्षेची गंभीर कारणे आणि वाढता अपघाताचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे आणि पानवल ग्रामपंचायतीने पानवल धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे. मात्र, प्रशासनाने लावलेले इशार्यांचे फलक आणि बंदी आदेशाकडे पर्यटकांकडून सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. धबधब्याच्या मुख्य प्रवाहात पर्यटक बिनधास्तपणे उतरत असून, धोकादायक पद्धतीने फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी स्टंटबाजी केली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धबधब्यांच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांची दखल घेत प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पानवल धबधबा परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली. तसेच बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीने प्रवेशद्वारावर फलक लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या बंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रवेशद्वारावर किंवा धबधबा परिसरात पर्यटकांना रोखण्यासाठी कर्मचारी अथवा पोलिसांची नियुक्ती नसल्याने पर्यटक थेट धबधब्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे प्रशासनाचे आदेश केवळ फलक आणि बॅनरपुरतेच मर्यादित राहिल्याची चर्चा आहे.




