
पावसाच्या सरी अन् खेळांची धमाल; विद्यार्थ्यांची वर्षा सहल अविस्मरणीय
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेची वर्षासहल उत्साहात संपन्न
खंडाळा : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडीच्या विद्यार्थ्यांची वर्षा सहल पावसाच्या सरींचा आनंद घेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. हिरवाईने नटलेला निसर्ग, बरसणारा पाऊस आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर आनंदाने फुलून गेला.
या वर्षा सहलीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शारीरिक तंदुरुस्ती आणि खिलाडूवृत्ती विकसित व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो आणि रस्सीखेच यांसारख्या पारंपरिक मैदानी खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. पावसात खेळताना विद्यार्थ्यांनी केलेली धमाल-मस्ती हा सहलीचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला.
यासोबतच या वर्षा सहल उपक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त व उत्साही सहभाग दर्शविला. विशेष म्हणजे पालकांनीही विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत सहलीचा आनंद द्विगुणित केला. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजन नव्हे, तर अनुभवातून शिक्षणाची अनोखी पर्वणी मिळाली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी उदय रहाटे, शाळेचे बालरक्षक श्री. विश्वनाथ शिर्के, पालक श्री. मारुती कुर्टे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्गाचे विविध पैलू तसेच कोकणची वैशिष्ट्ये, येथील जीवनशैली आणि निसर्गसंपदा,
शेतीची विविध कामे, शेतीचे महत्त्व, यांची माहिती दिली. चर्चात्मक स्वरूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देणारी ही वर्षा सहल आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरली. ‘निसर्गाच्या सान्निध्यातून आनंदी व अनुभवाधारित शिक्षण’ या संकल्पनेची प्रचिती या उपक्रमातून आली.
या उपक्रमाचे नियोजन रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सविता तोटावार, वाटद केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम. मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, शाळेच्या शिक्षिका पूनम कुलकर्णी यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष श्री. अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निकिता कुर्टे यांच्यासह पालकांचे व ग्रामस्थांचे यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही वर्षा सहल अविस्मरणीय ठरली. पावसाच्या सरींत निसर्गाचा आनंद घेत, खेळातून उत्साह अनुभवत आणि अनुभवातून ज्ञान मिळवत विद्यार्थ्यांनी या सहलीच्या सुंदर आठवणी आपल्या मनात साठवून ठेवल्या.




