
*अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर वर्षभर कारवाई नाही; मराठी शिकण्यासाठी फडणवीस सरकारची मुदतवाढ
मुंबई :-राज्यभरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत मराठी न आल्यामुळे संबंधित चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.*
मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ मिळावा, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. तातडीने मराठी भाषा शिकणे शक्य नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मराठी शिकण्यासाठी त्यांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर मराठी न आल्यामुळे कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या कालावधीत विविध माध्यमांतून क्लासेस घेऊन चालकांना जुजबी मराठी शिकवण्याची व्यवस्था केली जाईल.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “मराठी बोला आणि महाराष्ट्र जोडा” हा कार्यक्रम सुरू करण्याची भूमिका त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
या निर्णयामुळे राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, सरकारच्या या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेला दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.




