
कांदा ७० रुपये किलो; आठवडभरात दरात १० ते १५ रुपयांनी वाढ!
पुणे : पावसाने ओढ दिल्याने कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला असून, जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. परराज्यांतूनही महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे आठवडाभरापासून कांद्याचा दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढला आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर ५० ते ७० रुपये झाला आहे.
किरकोळ बाजारातून कांद्याला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने आठवडाभरापासून चांगल्या प्रतीच्या कांद्यात किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. जुन्या कांद्याचा साठा संपत चालला आहे. पावसामुळे साठवणुकीतील जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. बाजारात आवक होत असलेल्या कांद्यामध्ये खराब कांद्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
‘मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज ९० ते १०० गाड्यांमधून कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ३५० ते ४२० रुपये दर मिळाला आहे. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, तसेच पुणे जिल्ह्यातील मंचर, खेड, शिरूर, आंबेगावमधून कांद्याची आवक होत आहे. शेतकऱ्यांकडे साठवणुकीतील कांद्याचे प्रमाण कमी आहे. जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
बांगलादेश, श्रीलंकेतून कांद्याला मागणी
महाराष्ट्रातील कांद्याला परराज्यांतून मागणी वाढली आहे. बांगलादेश, श्रीलंकेतून कांद्याला मागणी वाढली आहे. साठवणुकीतील कांदा दिवसेंदिवस कमी होत आहे. कांद्याला यापुढील काळात मागणी राहणार आहे. त्यामुळे कांद्याचा दर टिकून राहणार आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला ६० ते ७० रुपये किलो दर मिळाला आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. साठवणुकीतील जुन्या कांद्याचा साठा संपत आला असून, नवीन लाल कांद्याचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यापुढील काळात कांद्याचा दर तेजीत राहणार आहे. – रितेश पोमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड




