
राजापूर तालुक्यात १,७१० रेशनकार्डधारक अपात्रांच्या यादीतमिशन सुधार अभियानांतर्गत पडताळणी सुरू; गरजवंतांना लाभ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न
राजापूर : समाजातील कमी उत्पन्न असलेल्या आणि खऱ्या गरजवंतांना शासनाच्या रेशनिंग धान्य वितरण योजनेचा लाभ मिळावा, तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून होणारा गैरवापर रोखावा, या उद्देशाने शासनातर्फे ‘मिशन सुधार अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राजापूर तालुक्यातील तब्बल १ हजार ७१० रेशनकार्डधारकांचा अपात्र लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
या यादीमध्ये दुबार नोंदणी झालेले लाभार्थी, उत्पन्न वाढलेले लाभार्थी, संस्था संचालक असलेले लाभार्थी तसेच सलग सहा महिने रेशनिंग धान्याची उचल न करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. संबंधित लाभार्थ्यांची गावोगावच्या रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. या पडताळणीनंतर अपात्र आढळणाऱ्या लाभार्थ्यांची नावे रेशनिंगच्या लाभार्थी यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणून पात्र लाभार्थ्यांनाच शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. राजापूर तालुक्यात अंत्योदय योजनेचे ४ हजार २३४, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे २६ हजार २३८, असे मिळून ३० हजारांहून अधिक रेशनकार्डधारक आहेत.
मिशन सुधार अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या अपात्र लाभार्थ्यांच्या यादीत १ हजार ७१० जणांचा समावेश असून, विविध निकषांच्या आधारे त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेत किती लाभार्थी प्रत्यक्षात अपात्र ठरतात आणि किती नावे लाभार्थी यादीतून वगळली जातात, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकट : मिशन सुधार अभियानानुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे वर्गीकरण
दुबार नोंदणी झालेले लाभार्थी : २८७
उत्पन्न वाढलेले लाभार्थी : ४७८
सलग सहा महिने रेशन न उचलणारे : ८५७
संस्था संचालक असलेले लाभार्थी : ८८
एकूण : १,७१० लाभार्थी



