
अल्पवयीन मुला-मुलींसाठी समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम राबविण्याची भाजपची मागणी
खेड : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी अल्पवयीन मुला-मुलींसाठी पोलिस विभाग व तहसील प्रशासनामार्फत समुपदेशन आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी (भाजपा) खेड यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात भाजपा खेडच्या पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि खेड पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन दिले.
खेड पोलीस ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच दिवशी संबंधित संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केवळ कायदेशीर कारवाईबरोबरच अल्पवयीन मुला-मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, चुकीच्या वर्तनाची वेळीच जाणीव करून देणे आणि आवश्यकतेनुसार समुपदेशन उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात पोलिस विभाग आणि तहसील प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नियमित जनजागृती व समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित केल्यास मुला-मुलींना त्यांच्या हक्कांची, सुरक्षिततेची तसेच संशयास्पद अथवा अनुचित वर्तनाची माहिती मिळू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या विकृतींना आळा घालण्यास मदत होईल, अशी भूमिका भाजपने मांडली.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तुषार पवार, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, बाळू वर्मा, प्रथमेश सुर्वे आणि अमित खेडेकर आदी उपस्थित होते.



