
तुकाराम मुंढेंच्या FDA चा डॉमिनोज पिझ्झाला दणका; मुंबईसह राज्यातील ४ शाखांचे परवाने निलंबित!
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या कारवाया सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, भेसळयुक्त पनीर अशा अनेक कारवाया एफडीएकडून करण्यात आल्या आहेत.
आता तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाने डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिला आहे. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर ‘डोमिनोज पिझ्झा’च्या चार शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं अनेकदा उल्लंघन झाल्याचं आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई ही करण्यात आलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या चार शाखांपैकी तीन शाखा मुंबईतील आहेत, तर चौथी शाखा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.




