जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव’ शुक्रवारी रत्नागिरीत शेतकऱ्यांकडून थेट खरेदीची संधी; पाककला स्पर्धेसह विविध उपक्रमांची रेलचेल


​रत्नागिरी, दि. १२ )- शहरी भागातील नागरिकांना रानभाज्या व पौष्टिक तृणधान्यांची ओळख व्हावी आणि ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट (SHG) व शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) थेट बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने रत्नागिरीत ‘जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव व पाककला स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत माळनाका येथील विवेक हॉटेल (देसाई बँक्वेट हॉल) येथे पार पडेल.
​महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रकल्प संचालक (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
​महोत्सवातील प्रमुख आकर्षणे:​भव्य प्रदर्शन व थेट खरेदी: नागरिकांना विविध रानभाज्या, पौष्टिक तृणधान्ये (नाचणी, वरी, बाजरी, ज्वारी, राळा, कोदू, कुटकी इत्यादी), प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ आणि सेंद्रिय उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची संधी मिळेल.
​पाककला स्पर्धा: महोत्सवादरम्यान रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य पाककला अशा दोन स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, तृणधान्य पाककृती स्पर्धेसाठी पहिल्या ३० तर रानभाजी पाककृती स्पर्धेसाठी पहिल्या ४० स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल.
​तज्ज्ञांचे मार्गदर्शन: नामांकित कृषी शास्त्रज्ञ व आरोग्य तज्ज्ञांमार्फत रानभाज्या आणि तृणधान्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे व प्रक्रिया उद्योगाबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल.
​रील (Reels) स्पर्धा बक्षीस वितरण: रानभाज्यांचे महत्त्व तरुण वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी ४ ते १२ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन रील स्पर्धेतील ३ उत्कृष्ट विजेत्यांना या मुख्य कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
​पाककला स्पर्धा नावनोंदणीसाठी संपर्क:
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
​हर्षला पाटील: ९४२२४४१५७१
​नेहा पवार: ९४२३२०३६४१
गौरी शेट्ये: ९४०३१४४५६१
​कोकणातील निसर्ग जैवविविधतेने समृद्ध असून, पावसाळ्यात कोणत्याही रासायनिक खतांशिवाय उगवणाऱ्या रानभाज्या आणि रोजच्या आहारातील तृणधान्ये आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी, महिला बचत गट आणि गृहिणींनी या महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि पाककला स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button