
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्च मुख्य काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग युद्धपातळीवर काम करीत असून, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी ही माहिती दिली.
महामार्गावरील विविध टप्प्यांवरील कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. संगमेश्वर येथील पुलाची दुसरी लेन येत्या चार ते पाच दिवसांत वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असून, त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीत मोठी घट होणार आहे. तसेच पाली आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामेही वेगाने सुरू असून, दोन्ही पूल जुलैअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय लांजा, पाली आणि संगमेश्वर येथील सर्व्हिस रोडचे कामही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक तसेच महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण महामार्गावरील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे जात असताना केवळ चिपळूण येथील पुलाच्या कामासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. दुसरीकडे निवळी येथील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात असून, तेही लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महामार्गाच्या कामादरम्यान स्थानिक गरजांनुसार काही अतिरिक्त कामे आणि सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. या कामांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, मुख्य महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच ही अतिरिक्त कामे हाती घेतली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com




