चिपळूणच्या पतसंस्थेत ७४ लाखांचा कथित गैरव्यवहार; अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा


कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखवून रक्कम हडपल्याचा आरोप; मुदतठेवींचे पैसेही परत न केल्याची तक्रार


चिपळूण पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय निमशासकीय सहकारी पतसंस्थेत तब्बल ७४ लाख २७ हजार रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारी सचिव, सदस्य आणि लिपिक अशा एकूण १० जणांविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, २०१९ ते मे २०२६ या कालावधीत सभासदांना कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात संबंधितांना कर्जाची रक्कम न देता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय ठेवीदारांनी ठेवलेल्या मुदतठेवींची मुदत संपल्यानंतरही त्यांची रक्कम परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या कथित गैरव्यवहारामुळे सभासद व ठेवीदारांचे ७४ लाख २७ हजार रुपये अडकले असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी येथील वैभव ठसाळे यांनी अलोरे-शिरगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून संस्थेतील कर्जवाटपाची कागदपत्रे, ठेवीदारांच्या नोंदी, मुदतठेवी तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. तपासातून या कथित गैरव्यवहाराची नेमकी व्याप्ती आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button