भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणची आढावा बैठक उत्साहात संपन्न


संघटनात्मक बांधणी, महिला सक्षमीकरण आणि आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर चर्चा


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महिला मोर्चाच्या रत्नागिरी दक्षिण अंतर्गत असलेल्या मंडळांच्या अध्यक्षांची उपस्थिती होती.

सौ. वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे, सामाजिक उपक्रम राबवणे, जनसंपर्क वाढवणे, प्रसिद्धी माध्यमांचा प्रभावी वापर करणे तसेच आगामी कार्यक्रमांची आखणी आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

महिला मोर्चा ही केवळ राजकीय संघटना नसून महिलांच्या सन्मानासाठी, स्वावलंबनासाठी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी कार्य करणारी शक्ती आहे. प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने सक्रियपणे आणि जबाबदारीने काम करून संघटना अधिक मजबूत करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी यावेळी केले.

महिलांचे संघटन, महिला सक्षमीकरण आणि समाजहिताचे उपक्रम या माध्यमातून भाजपा महिला मोर्चाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button